(Importance of Hindu ritual Shraddha)
श्राद्धाचे महत्व आणि पद्धत

श्राद्धविषयक विधान

जे श्रद्धेने दिले जाते त्याला ‘श्राद्ध’ म्हणतात. श्रद्धा व मंत्राच्या संयोगाने जो विधी होतो त्याला ‘श्राद्ध’ म्हणतात. जीवात्म्याचे पुढील जीवन मागील संस्कारांनी बनते. म्हणूनच श्राद्ध वासन अशी भावना केली जाते की त्याचे पुढचे जीवन चांगले व्हावे. ज्या पितरांसाठी आपण कृतज्ञतेने श्राद्ध करतो, ते आपल्याला मदत करतात.

वायू पुराणात आत्मज्ञानी सूत मुनी म्हणतात “हे ऋषी-मुनीनो परमेष्ठी ब्रह्मदेवांनी पूर्वकाळी जी आज्ञा दिली आहे ती तुम्ही ऐका. ब्रह्मदेवांनी सांगितले आहे की ‘जे मनुष्यलोकाच्या पोषणाच्या दृष्टीने श्राद्ध तर्पण करतील, त्यांना पितृगण सदैव पुष्टी व संतती देतील, श्राद्धकर्मात आपल्या पणजोबांपर्यंतच्या नावांचे व गोत्राचे उच्चारण करून ज्या पितरांना काही दिले जाईल ते पितृगण त्या श्राद्धदानाने अत्यंत संतुष्ट होऊन देणाऱ्याच्या अपत्यांना संतुष्ट ठेवतील, शुभ आशीर्वाद देतील आणि विशेष साहाय्यता करतील.’ हे ऋषींनो! त्याच पितरांच्या कृपेने दान, अध्ययन, तपश्चर्या इत्यादींनी सिद्धी मिळते. ते पितृगणच आपणा सर्वांना सत्प्रेरणा प्रदान करणारे आहेत. यात यत्किंचितही शंका नाही.

नियमित गुरुपूजा वगैरे सत्कार्यामध्ये निमग्न राहून योगाभ्यासी सर्व पितरांना तृप्त ठेवतात. योगबळाने ते त्या चंद्रालाही तृप्त करतात, ज्याच्यामुळे त्रैलोक्याला जीवन लाभते. म्हणून योगाचा महिमा जाणणाऱ्यांनी सदैव श्राद्ध केले पाहिजे, मनुष्याद्वारे पितरांना श्रद्धापूर्वक दिलेल्या वस्तूंनाच श्राद्ध असे म्हटले जाते. श्राद्धकर्मात जो मनुष्य पितरांची पूजा न करताच एखाद्या अन्य क्रियेचे अनुष्ठान करतो, त्याच्या त्या क्रियेचे फळ राक्षस व दानवांना मिळते.”

श्राद्धासाठी योग्य ब्राह्मण

वराह पुराणात श्राद्धाच्या विधीचे वर्णन करताना भगवान मार्कंडेय गौरमुख ब्राह्मणाला म्हणतात: “विप्रवर ! षट्वेदांगांना जाणणारे, यज्ञानुष्ठानात तत्पर, तपस्वी ब्राह्मण, भाचा, मुलीचा मुलगा, सासरे, जावई, मामा, पंचाग्नी तापविणारे, शिष्य, नातेवाईक तसेच आपल्या आई-वडिलांच्या आवडत्या ब्राह्मणांना श्राद्धकर्मासाठी नियुक्त केले पाहिजे.

मनुस्मृतीत येते : “जे क्रोध न करणारे,प्रसन्नमुख आणि लोकोपकारात निमग्न आहेत अशा श्रेष्ठ ब्राह्मणांना मुनींनी श्राद्धासाठी देवतुल्य म्हटले आहे.”

अक्रोधनान्सुप्रसादान्वदन्त्येतान्पुरातनान् ।
लोकस्याप्यायने युक्तान्श्राद्धदेवान्द्विजोत्तमान् । । ३.२१३[२०३ं]

(मनुस्मृती: ३.२१३)

वायू पुराणात येते :

“श्राद्धाच्या वेळी हजारो ब्राह्मणांना जेवू घातल्याने जे फळ मिळते, ते फळ योगात निपुण एकच ब्राह्मण तृप्त होऊन देतो तसेच महाभयापासून (नरकातून) सुटका करतो. एक हजार गृहस्थी, शंभर वानप्रस्थाश्रमी किंवा एक ब्रह्मचारी या सर्वांहून एक योगी श्रेष्ठ आहे.

ज्या मृतात्म्याचा मुलगा अथवा नातू ध्यानात निमग्न राहणाऱ्या एखाद्या योगाभ्यासीला श्राद्धाच्या वेळी जेवू घालेल, त्याचे पितृगण असे परम संतुष्ट होतील जसे चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकरी संतुष्ट होतो.

श्राद्धाच्या वेळी जर एखादा योगाभ्यासी, ध्यानपरायण भिक्षुक मिळाला नाही तर दोन ब्रह्मचाऱ्यांना जेवू घातले पाहिजे. तेही न मिळाल्यास एखाद्या उदासीन ब्राह्मणाला जेवू घातले पाहिजे.

जो पुरुष शंभर वर्षे फक्त एका पायावर उभे राहून, वायूचे सेवन करून राहतो, त्याच्याहूनही ध्यानी व योगी श्रेष्ठ आहेत अशी ब्रह्मदेवांची आज्ञा आहे.

मित्रघातकी, विकृत नखांचा, काळ्या दातांचा, कन्यागामी, आग लावणारा, मद्य विकणारा, समाजात निंदनीय, चोर, चहाडखोर, गावचा पुरोहित, पगार घेऊन शिकविणारा, पुनर्विवाहित स्त्रीचा पती, आई वडिलांचा त्याग करणारा, हीन जातीच्या मुलाबाळांचे संगोपन करणारा, शूद्र स्त्रीचा पती तसेच मंदिरात पूजा-पाठ करून पोट भरणारा ब्राह्मण श्राद्धासाठी आमंत्रण देण्याच्या योग्य नाही, असे सांगितले गेले आहे.

ज्यांच्या घरी लहान मुलांचे सूतक आहे, जे दीर्घ काळापासून रोगग्रस्त आहेत, मलिन व पतित विचारांचे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे श्राद्धकर्म पाहू देऊ नये. जर या लोकांची दृष्टी श्राद्धाच्या अन्नावर पडली तर ते अन्न हवन करण्याच्या उपयोगाचे राहत नाही. अशा लोकांचा स्पर्श झालेले श्राद्धादी संस्कार अपवित्र होतात.”

(वायू पुराण: ७८.३९, ४०)

ब्रह्महत्या करणारे, कृतघ्न, नास्तिक, गुरुपत्नीगामी, दरोडेखोर, अत्याचारी, आत्मज्ञानापासून वंचित तसेच इतर पापकर्मपरायण मनुष्य श्राद्धकर्मासाठी वर्जित आहेत. विशेषतः देवी-देवता आणि देवर्षीची निंदा करणारे लोकही वर्ज्य आहेत. या लोकांनी श्राद्धकर्म होताना पाहिल्यास ते निष्फळ होते.

(वायू पुराण: ७८.३४,३५)

ब्राह्मणास आमंत्रण

विचारवान व्यक्तीने संयमी, श्रेष्ठ ब्राह्मणांना श्राद्धाच्या आदल्या दिवशीच आमंत्रण देणे आवश्यक आहे. श्राद्धाच्या दिवशी जर एखादे अनिमंत्रित तपस्वी ब्राह्मण, अतिथी किंवा साधू-संन्यासी घरी आले तर त्यांनाही जेवू घालावे. श्राद्ध करणाऱ्याने घरी आलेल्या ब्राह्मणांचे प्रथम पाय धुवावे. नंतर आपले हात धुऊन त्यांना आचमन द्यावे. त्यानंतर त्यांना आसनावर बसवून जेवू घालावे. पितरांसाठी विषम अर्थात् एक, तीन, पाच, सात इ. संख्येत तसेच देवतांसाठी सम अर्थात् दोन, चार, सहा, आठ इ. संख्येत ब्राह्मणांना जेवू घालण्याची व्यवस्था करावी. देवता व पितरे या दोहोंसाठी प्रत्येकी एका ब्राह्मणास जेवू घालण्याचेही विधान आहे.

वायू पुराणात गुरू बृहस्पती आपले पुत्र शंयू यांना म्हणतात : “जितेंद्रिय व पवित्र होऊन पितरांना गंध, फुले, धूप, तूप, आहुती, फळ, मूळ इ. अर्पण करून नमस्कार केला पाहिजे. सर्वप्रथम पितरांना तृप्त करून नंतर आपल्या कुवतीनुसार अन्न-धान्य व दक्षिणा देऊन ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे. सदैव श्राद्धाच्या वेळी पितृगण वायुरूप धारण करून ब्राह्मणांना पाहून त्यांच्यात प्रविष्ट होतात. म्हणून त्यांना जेवू घालावे असे मी सांगत आहे. अन्न, वस्त्र, विशेष दान, भक्ष्य, पेय, गाय, घोडा, गाव इ. चे दान देऊन श्रेष्ठ ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे. ब्राह्मणांच्या आदरातिथ्याने पितृगण प्रसन्न होतात.”

(वायू पुराण: ७५.१२-१५)

श्राद्धाच्या वेळी हवन व आहुती “पुरुषप्रवर ! श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना जेवू घालण्यापूर्वी त्यांची आज्ञा घेऊन मीठ न घातलेले (अळणी) अन्न व भाजीचे अग्नीत तीन वेळा हवन करावे. यात ‘अग्नये कव्यवाहनाय स्वाहा…’ या मंत्राने पहिली आहुती, ‘सोमाय पितृमते स्वाहा…’ या मंत्राने दुसरी आहुती आणि ‘वैवस्वताय स्वाहा…’ मंत्राचे उच्चारण करून तिसरी आहुती देण्याचे विधान आहे. मग हवन केल्यानंतर उरलेले अन्न थोडे-थोडे सर्व ब्राह्मणांच्या पात्रांमध्ये द्यावे.”

अभिश्रवण व रक्षक मंत्र

श्राद्धविधीत मंत्रांना खूप महत्त्व आहे. श्राद्धात तुम्ही दिलेल्या वस्तू कितीही मौल्यवान असोत, परंतु तुमच्याकडून जर मंत्रांचे योग्य उच्चारण झाले नाही तर सर्व कार्य विस्कळीत होते. मंत्रोच्चारण शुद्ध असावे, ज्यांच्यासाठी श्राद्ध करीत आहात त्यांच्या नावाचे उच्चारणही स्पष्ट असावे. श्राद्धात ब्राह्मणांना जेवू घालताना रक्षक मंत्राचा पाठ करून जमिनीवर तीळ पसरून ठेवावे आणि आपल्या पितृरूपात त्या श्रेष्ठ ब्राह्मणांचेच चिंतन करावे.

रक्षक मंत्र’पुढीलप्रमाणे

यज्ञेश्वरो यज्ञसमस्तनेता भोक्ताऽव्ययात्मा हरिरीश्वरोऽस्तु ।

तत्संनिधानादपयान्तु सद्यो रक्षांस्यशेषाण्यसुराश्च सर्वे ॥

‘येथे हवन केलेल्या सर्व फळांचे भोक्ता यज्ञेश्वर भगवान श्रीहरी विराजमान आहेत. तरी त्यांच्या उपस्थितीमुळे सर्व राक्षस व असुरांनी येथून त्वरित पळून जावे.’

(वराह पुराण: १४.३२)

ब्राह्मण जेवत असताना अशी भावना करावी की ‘या ब्राह्मणांच्या शरीरात प्रविष्ट झालेले माझे वडील, आजोबा व पणजोबा आज भोजनाने तृप्त व्हावेत. ‘ जसे येथून पाठविलेले रुपये इंग्लंडमध्ये ‘पाऊंड’, अमेरिकेत ‘डॉलर’ व जपानमध्ये ‘येन’ होऊन मिळतात, अगदी असेच पितरांसाठी केलेल्या श्राद्धाचे अन्न, श्राद्धकर्माचे फळ आपली पितरे जेथे आहेत, जशी आहेत, त्यांच्या अनुरूप होऊन त्यांना मिळते. परंतु यात ज्यांच्यासाठी श्राद्ध केले जात आहे त्यांची नावे, त्यांच्या वडिलांची नावे व गोत्राची नावे यांचे स्पष्ट उच्चारण झाले पाहिजे.

विष्णू पुराणात येते:

श्रद्धासमन्वितैर्दत्तं पितृभ्यो नामगोत्रतः । यदाहारास्तु ते जातास्तदाहारत्वमेति तत् ॥

‘श्रद्धावान व्यक्तींकडून नाव आणि गोत्राचे उच्चारण करून दिलेले अन्न पितृगणांना ते जशा आहारास योग्य असतील तसेच होऊन मिळते. ‘ श्राद्धात भोजन करविण्याचे विधान

(विष्णू पुराण: ३.१६.१६)

शुभ भवंन्तु.